चंद्रपूर महानगरपालिकेचा महापौर काँग्रेसचाच होणार असा दावा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला. तर, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी महापौर शिवसेना पक्षाचा करण्याची मागणी केली आहे.
Chandrapur Municipal Corporation Mayor :-
चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर पदावरून दावे प्रतिदावे पहायला मिळत आहे. अशातच चंद्रपूर च्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महापौर पद बाबत मोठा दावा केला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचाच महापौर होणार असा दावा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे.
"महापौर काँग्रेसचाच बसायला हवा. महापौर हा धानोरकर किंवा वडेट्टीवार गटाचा राहणार नसून, महापौर हा काँग्रेस पक्षाचा असेल. सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट यांच्याशी चर्चा सुरू असून, त्यांना सोबत घेऊन आम्ही सत्तास्थापन करणार आहोत", असे खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.
" काँग्रेसचे जवळपास 30 नगरसेवक निवडून आलेले असून, शिवसेना ठाकरे गटाचे 6 नगरसेवक निवडून आलेले आहेत. जो काही वाटा त्यांना देता येईल तो त्यांना दिला जाईल", असेही प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.
दोन चार दिवसांपूर्वी धानोरकर गट आणि वडेट्टीवार गट यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. प्रतिभा धानोरकर यांनी वडेट्टीवार यांच्यावर कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. तर, खासदार झाले म्हणून जिल्ह्याचे मालक ठरत नाही अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली होती.
त्यानंतर वाद मिटवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना मध्यस्थी करावी लागली. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठां सोबतच्या बैठकीनंतर आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले , "महापौर पदाबाबत निर्णय खासदार प्रतिभा धानोरकर घेतील, गटनेते पदाचा निर्णय प्रदेश स्तरावर होणार असून, स्थायी समिती (Standing Committe) बाबत निर्णय स्वतः विजय वडेट्टीवार घेणार.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी उबाठा सुद्धा आग्रही आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी काँग्रेस सह भाजपची कोंडी केली आहे. महापौर पदावरील दावा त्यांनी कायम ठेवला आहे. त्यामुळे अजून चुरस वाढली आहे.
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने संयुक्त गटनेते पदी राहुल विरुटकर यांची नियुक्ती करून नागपूर आयुक्त कार्यालय मध्ये नोंदणी केली. तर, काँग्रेस सोबत निवडणूक लढविलेल्या जन विकास सेना पक्षाने MIM मधून निवडून आलेल्या नगरसेवक सोबत गटाची नोंदणी केली. या आघाडीचे गटनेते जनविकास सेनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांची निवड करण्यात आली. त्यामुळे महापौर पद कोणत्या पक्षा कडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या