मुंबई:-
बोधगया आंदोलनाचे प्रणेते अनागारिक धम्मपाल, पेरियार स्वामी जयंती आणि भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशव्यापी जन आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून, आझाद मैदान येथे जन आक्रोश आंदोलन पार १७ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व भारतीय बौद्ध महासभा चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रिय अध्यक्ष भिमराव यशवंत आंबेडकर हे मुंबईत होणाऱ्या जन आक्रोश आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. तर, देशभरात उद्या सर्व राज्यातील मंत्रालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून, सर्व मुख्यमंत्री, प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती यांना निवेदन देणार आहेत.
![]() |
| Photo Source FaceBook |
काय आहेत आंदोलकांच्या मागण्या ?
महाबोधी महाविहार करिता सध्या अंमलात असलेला बोधगया महाविहार कायदा १९४९ (BT Act 1949) कलम २५, २६ आणि १३ हे संविधानाचे उल्लंघन करते. म्हणून हा कायदा रद्द करून, महाबोधी महाविहार चे संपूर्ण व्यवस्थापन बौध्द समाजा कडे सोपवण्यात यावे व भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर यांना व्यवस्थापन समितीत कायमस्वरूपी स्थान द्यावे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ स्मारकाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नसून, जन्मस्थळ ठिकाणी उभारलेले स्मारक सध्या विचारधारेच्या विरोधात चालवले जात आहेत, असा आरोप भारतीय बौध्द महासभा संस्थेचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थळ स्मारक भारतीय बौद्ध महासभा संस्थे कडे सोपवावी अशी मागणी करण्यात येणार आहे.
बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मिळालेल्या सरकारी जमिनीवर दिक्षाभूमीचे विद्रुपीकरण थांबवावे. नागपूर च्या दीक्षाभूमी वर केलेला बेकायदेशीर कब्जा हटवून, त्याचे व्यवस्थापन भारतीय बौद्ध महासभा चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव यशवंत आंबेडकर यांच्या कडे द्यावे अश्या तीन मागण्या आंदोलकांच्या आहेत.
कुठल्या संघटनेचा पाठिंबा ?
वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले आहे. बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तर, अनेक सामाजिक संघटनांना आंदोलनात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.

0 टिप्पण्या