मुंबई:- मागील काही दिवसांपासून जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा माध्यमांमध्ये मध्ये सुरू होती. ही चर्चा चालू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड यांनी ह्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. जयंत पाटील यांच्या राजीनामा हा खोडसाळपणा असून, पक्ष हा शिस्तीनुसार चालत असतो असं ते समाज माध्यमांवर म्हणाले होते. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांची बैठक मुंबई येथे पक्षाचे सर्वेसर्वा व राज्यसभा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांचे नाव प्रदेशाध्यक्ष म्हणून जाहीर केले.
शशिकांत शिंदे कोण आहेत?
शशिकांत शिंदे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील वरिष्ठ नेते असून, चार वेळा विधानसभेचे आमदार राहिलेले आहेत. 1999 ते 2009 या कालावधीत ते जावली मतदारसंघ तर, 2009 ते 2019 या कालावधीत ते कोरेगाव मतदार संघातून निवडून आले होते. जून 2013 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांना जलसंपदा मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली होती. 2019 च्या नोव्हेंबर मध्ये त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली होती. शशिकांत शिंदे यांनी सुरुवातीला सातारा जिल्हाध्यक्षा म्हणून काम पाहिले. विधानसभेचे पक्ष प्रतोद म्हणून त्यांना संधी देण्यात आलेली असून, विधान परिषदेचे ते आमदार देखील आहेत.
जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाचे सर्वेसर्वा तथा राज्यसभा खासदार शरद पवार यांचे निकटवर्तीय असून, गेल्या सात वर्षापासून ते पक्षाचे काम प्रदेशाध्यक्ष म्हणून पाहत होते. 2019 आणि 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्वात लढल्या गेल्या.
लोकसभा निवडणुकीत पराभव
शशिकांत शिंदे यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. ही निवडणूक त्यांनी तुतारी या चिन्हावर लढवली होती त्या आणि त्यांच्यासमोर आव्हान होते ते साताऱ्याचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे. उदयनराजे भोसले यांनी भाजप या पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्यांना ५,७१,१३४ इतकी मतं मिळाली होती. तर, शशिकांत शिंदे यांना पाच लाख 38 हजार 363 मतं मिळाली होती. 32,771 च्या फरकाने शशिकांत शिंदे यांचा लोकसभेत पराभव झाला होता.
शशीकांत शिंदे यांनी मानले आभार
"आम्ही चालवू हा पुढे वारसा" अश्या आशयाचे ट्विट करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तसेच राज्यसभा खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील व सर्व वरिष्ठ नेते यांचे आभार मानले आणि दिलेली जबाबदारी मी नम्रपणे स्वीकारतो अशी ग्वाही त्यांनी दिली.



0 टिप्पण्या